- भोसरीतील दुःखद घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- लग्न ठरत नसल्याने तरून गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. त्याच्या मोठ्या भावाचाही विवाह झालेला नव्हता. लॉकडाऊन होण्यापूर्वी तरुणाने अमरावती येथील अंजनगावी जाऊन आपल्या काकांच्या मदतीने मुलगीही पाहिली होती. मात्र मुलीकडून नकार आल्यानंतर त्यास आणखी नैराश्य आले.
त्याने गॅरेजमध्ये आज शनिवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला. तरुणाला त्वरीत यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ही घटना शनिवारी (दि. १३) दुपारी चऱ्होली येथे घडली. सागर विनायक बैतुले (वय ३०, रा. गोफणे बिल्डींग, आळंदी रोड, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लग्न ठरत नसल्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता त्याच्या भावाने व्यक्त केली.
















