न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मार्च २०२१) :- निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने रविवार दि. १४ मार्च २०२१ रोजी संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन च्या माध्यमातून भोसरी सेक्टर अंतर्गत मोरेवस्ती ब्रँच येथे सकाळी ९:०० ते ५:०० या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, वाय. सी. एम. रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी २२७ युनिट रक्त संकलन केले, विशेषतः या शिबिरात अंध व्यक्ती भीमराव साळुंखे यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग दर्शविला.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन पांडाभाऊ साने (सामाजिक कार्यकर्ता), यश साने (अध्यक्ष, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस युवा), कुंदनशेठ गायकवाड (सभापती – फ क्षेत्रीय समिती) यांच्या उपस्थित संपन्न झाले. दरम्यान या शिबिराला ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोरोनामुळे अनेक रुग्णांना रक्त,प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या सर्वांची अत्यंत आवश्यकता भासत आहे, त्यामुळे संत निरंकारी मिशनद्वारे एप्रिल २०२० पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये २१ रक्तदान शिबीर संपन्न झाली आहेत या मध्ये २१२८ युनिट रक्त संकलन ससून रुग्णालय रक्तपेढी, वाय. सी.एम. रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या मार्फत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फौंडेशनच्या स्वयंसेवकांनी अनेक वेळा आवश्यकतेनुसार प्लाझ्मादान करून अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवले.
या रक्तदान शिबिरात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार अंगद जाधव, सचिन महानोर यांनी केले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सेवादल तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी योगदान दिले.
















