- जेष्ठ नागरिकांची गैरसोय टाळा..
- शिवसेना समन्वयक प्रा. दत्तात्रय भालेराव यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या पिंपरी चिंचवड शहरात वेगाने वाढत असताना लसीकरण मात्र अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर, लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याशिवाय पर्याय नाही. केवळ कोविड केंद्र राहत्या घरापासून दूर असल्यामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहवे लागत आहे.
अजमेरा-मोरवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनाही याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कोविड लसीकरणासाठीची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने अजमेरा-मोरवाडी परिसरातील नेत्र रुग्णालयात नवीन कोविड केंद्र सुरु करून, जेष्ठ नागरिकांना कोविड लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, अशी मागणी शिवसेनेचे समन्वयक प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लसीकरणाचा वेग वाढवणं हाच कोरोनावर मात करण्यासाठीचा एकमेव उपाय आहे. २८ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरात याच गतीनं लसीकरण होत राहिलं तर, शहरातील नागरिकांना लस टोचायला काही वर्षं लागणार आहेत. अजमेरा मोरवाडी या परिसरात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना लसीकरणासाठी पिंपरीतील वायसीएम किंवा चिंचवडमधील मोहननगर येथील कोविड केंद्रावर जावे लागते. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी टाळाटाळ करीत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने अजमेरा-मोरवाडीमधील जवळच असणाऱ्या नवीन नेत्र रुग्णालयात कोवीड लसीकरण केंद्राची उभारणी व्हावी, असे या निवेदनात प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट आल्याने काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. तर अनेक ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आलेत. त्यामुळे कोरोनाच्या या भयावह परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल लसीकरणाचा वेग वाढवणे व त्यासाठी जास्तीत जास्त नवीन कोविड केंद्राची शहरात उभारणी करणे गरजेचे आहे.
– प्रा दत्तात्रय भालेराव (शिवसेना समन्वयक)….