कोरोनाच्या अनुषंगाने राज्य सरकारचा आयुक्तांना फतवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- महापालिका भवन, सर्व क्षेत्रीय कार्यालयांत, पालिकेच्या इतर ठिकाणी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ध्या कर्मचाऱ्यांना सुटी मिळणार आहे. या प्रकारे निम्मी उपस्थिती ३१ मार्चपर्यंत राहणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष निवडणुक आणि परिचारिका नियुक्ती प्रक्रियेसाठी पालिका भवनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
बांधकाम परवानगी विभागात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे संक्रमण वाढीचा धोका वाढला आहे. त्यात राज्य शासनाने सोमवारी (दि.१५) आदेश देऊन आरोग्य, वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळता महापालिका कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आयुक्तांनी वरील आदेश मंगळवारी (दि.१६) दिले आहेत. आरोग्य, वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत, रुग्णालय आणि कोरोनाविषयक कामकाजातील अधिकारी व कर्मचारी तसेच, ‘ अ ‘ व ‘ ब ‘ वर्गातील सर्व अधिकारी वगळून इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
गर्भवती महिला, अवयव प्रत्यारोपण, केमो थेरपी, इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी तसेच, दिव्यांग कर्मचाऱ्यांना गैरहजर राहण्याबाबत सवलत आहे. आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले जाणार आहे, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.