- पालिका आयुक्तांचा कडक कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत चालू वर्षात मिळकत करापोटी ४९५ कोटी रुपये वसूल झाले आहेत. अंदाजपत्रकीय उद्दीष्टापेक्षा ३७५ कोटी रुपयांनी मिळकत कर वसूल कमी असल्याने महानगरपालिकेमार्फत मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करणे अथवा जप्ती अनुषंगिक कठोर कारवाईची सुरु आहे. तसेच अशाप्रकारची कारवाईही मार्च महिन्यानंतरही सातत्याने सुरु राहणार आहे.
शासनाने एक वेळची विशेष बाब म्हणून अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कर भरणा करण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंतच सवलत दिलेली आहे. त्यानंतर कठोर कारवाईद्वारे थकबाकी वसूल करणेचे निर्देश दिलेले आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मिळकत कराचा भरणा करणेचे दृष्टीने ३१ मार्च २०२१ अखेर थकबाकीसह संपूर्ण कराचा भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपा शास्ती करामध्ये (विलंब दंड) ७५ % सवलत देण्यात येत आहे.
आज अखेर या सवलत योजने अंतर्गत ७४०१ मिळकतधारकांनी लाभ घेतला असून ८८.४९ कोटी रुपये मिळकत कराचा भरणा केला आहे. परंतु, वरील सवलती लागू असूनही ज्या मिळकतधारकांनी अद्यापही मिळकत कराचा भरणा केला नाही व ज्यांची थकबाकी २५ लाखापेक्षा जास्त आहे, अशा थकबाकीदारांची यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली असून त्यांची नावे क्षेत्रिय कार्यालय व विभागीय कार्यालयाचे दर्शनी भागात प्रसिध्द करण्यात येणार आहे. सर्व मिळकतधारकांनी मिळकत कराच्या विविध सवलत योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या थकीत मिळकत कराचा भरणा ३१ मार्च पूर्वी भरावा अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा पालिका आयुक्त यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.















