- बिजलीनगरमधील गिरीराज सोसायटी परिसरातील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने रस्त्याचे काम करणारा ठेकेदार चोरून वीज घेत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. यामुळे एक कुत्रा आणि कामगारही जखमी झाला. तरीदेखील वीज चोरीस सुरूच असल्याचा धक्कादायक आरोप बिजलीनगर येथील गिरीराज सोसायटीमधील नागरिकांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांसाठी लोखंडी सळई कापणे, रात्रीच्या वेळी हॅलोजनचा वापर करणे, रस्त्यावर पाणी मारण्यासाठी विजेवर चालणारा पंप वापरणे, आदी कामांसाठी महापालिकेचे डीपी बॉक्समधून ठेकेदार चोरून वीज घेतात. बिजलीनगर परिसरातील गिरीराज सोसायटीमध्ये अशाच प्रकारे महापालिकेचा ठेकेदार चोरून वीज घेत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे केली होती. फोटोसह केलेल्या या तक्रारीची दखल घेतली नाही व संबंधित ठेकेदाराकडून वीज चोरीस सुरूच आहे. चोरून वीज घेतल्यानंतर डीपी बॉक्सचा दरवाजाचा उघडाच ठेवण्यात येतो.
या परिसरात श्वानाला फिरविण्यासाठी एक महिला घेऊन आली. त्यावेळी श्वानाला विजेचा धक्का लागला. कुत्र्याला लावलेला पट्टा कापडी असल्याने ती महिला बचावली. सोमवारी (१५ मार्च) रोजी अशाच प्रकारे कामासाठी वीजचोरी करीत असताना एका कर्मचाऱ्याला विजेचा शॉक लागला. याबाबतही बिजलीनगर येथील महावितरणच्या कार्यालयास कळविले. मात्र त्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्याच्याच दुसऱ्या दिवशीही रात्री साडेनऊ वाजता ठेकेदाराने पुन्हा चोरून वीज घेतली. त्यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येऊन ठेकेदाराच्या काही मशीन जप्त केल्या. मात्र त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केल्याची माहिती नागरिकांना दिली नाही. नागरिकांनी बिल भरले नाही यामुळे कनेक्शन कट करण्याचा धडका महावितरणने सध्या लावला आहे. तर दुसरीकडे वीजचोरीची माहिती देऊनही महावितरणचे कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महापालिकेच्या ठेकेदारासोबत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे तर नाही ना, अशी कुजबूज नागरिकांमध्ये सुरू आहे.