- पाच जणांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- फॅब्रीकेशनचे काम करीत असताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू झाला. चिखली येथे १८ डिसेंबर २०१६ रोजी हा अपघात झाला होता. मात्र ही घटना चिंचवड येथे झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात तब्बल पाच वर्षांनी गुन्हा दाखल केला आहे.
विजय अभिमान भोरे, बालाजी अभिमान माने, महेश जाधव (सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), गजानन बापूराव पानसरे (रा. बिजलीनगर, चिंचवड), करण वाघेरे (रा मोरवाडी, पिंपरी), अशी आरोपींची नावे आहेत.
प्रदीप कांतीलाल जोगदंड (वय २२), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुंफाबाई कांतीलाल जोगदंड (वय ५०, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवडगाव, मूळगाव जांब, ता. भूम, जि. उस्मानाबाद) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२०) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्रदीप जोगदंड हा चिखली येथे विष्णू ग्रीन्स या बांधकामाच्या साइटवरील बाराव्या मजल्यावर फॅब्रिकेशनचे काम करीत होता. त्यावेळी शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र आरोपींनी संगनमत करून हा अपघात झाल्याची माहिती फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली. ही घटना आरोपी गजानन पानसरे याच्या बिजलीनगर, चिंचवड येथील घरात घडल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना दमदाटी केली. त्यांची दिशाभूल करून त्यांना किरकोळ रक्कम देऊन जबरदस्तीने त्यांची ठकवणूक करण्यासाठी आरोपींनी खोटे बनावट व बेकायदेशीर स्मरणपत्र तयार करून घेतले. तसेच प्रदीप काम करीत असताना त्यास सुरक्षिततेची कोणतीही साधने उपलब्ध करून दिली नाहीत, तसेच त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















