- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- शहरातील रस्ते साफसफाईच्या कामाचा गेल्या काही वर्षांपासून मुदतवाढीचा खेळ सुरू आहे. त्यासाठी नव्याने काढलेल्या निविदा प्रक्रियेबाबत सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाने घेतलेले निर्णय संशयास्पद आहेत.
या निविदा प्रक्रियेत काही मंडळींना वाचविण्यासाठी सत्ताधारी आणि संबधित अधिकाऱ्यांनी अचानक निविदा प्रक्रिया रद्द करून मोठा झोल घातल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत कोणी सहभागी झाले होते आणि अधिकारी कोणाला वाचवत आहेत, याची उत्तरे मिळण्यासाठी सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी राष्टवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.
आयुक्त राजेश पाटील यांना वाघेरे यांनी पत्र दिले आहे. वाघेरे म्हणाले, रस्त्यांची रोडस्वीपर मशीनव्दारे साफसफाई करण्याची निविदा प्रक्रिया राबविली होती. सुमारे ७४२ कोटी रुपयांच्या निविदेत तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मिळून घोळ घातला. पितळ उघडे पडल्यानंतर संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्याची वेळ श्रावण हर्डीकर यांच्यावर आली होती. त्यानंतर १८ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची मनुष्यबळाच्या सहाय्याने साफसफाई करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना ती प्रशासनाने रद्द केली आहे.