- पालिका एजन्सीच्या माध्यमातून राबविणार नव्याने भरती प्रक्रिया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह इतर रुग्णालये, दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, फार्मासिस्ट, सफाई कर्मचारी आदी पदे सहा महिन्यांसाठी मानधन स्वरूपात भरण्यात येतात. मात्र, खासगी एजन्सीच्या माध्यमातून नेमण्यासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला आवश्यक असलेली वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, फार्मासिस्ट, सफाई कर्मचारी आदी पदे सहा महिन्यांसाठी मानधन स्वरूपात भरतात. त्यासाठी जाहिरात देऊन परीक्षा घेण्यात येते. निवड यादी प्रसिद्ध करून ही प्रक्रिया दर सहा महिन्यांने राबवावी लागते.
सद्य:स्थितीत स्थायी आणि अस्थायी आस्थापनेवरील पदसंख्या अपुरी आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दर सहा महिने कालावधीकरिता अस्थायी स्वरूपात मानधनावर सर्व पदे भरली जातात. त्यामध्ये प्रत्येक सहा महिन्यांनंतर जुन्या अधिकारी व कर्मचारी यांना संधी न देता नवीन उमेदवारांना संधी द्यावी, असा सरकारचा निर्णय आहे.
त्यामुळे प्रत्येक सहा महिन्यांनंतर जुन्या प्रशिक्षित झालेल्या कर्मचाऱ्यांना काढून नवीन भरती प्रक्रिया राबवावी लागते. काही कारणास्तव काही महिन्यांची मुदतवाढ दिल्यास ते कर्मचारी कामगार न्यायालयामध्ये दावा दाखल करून कायमस्वरूपी करण्यासाठी दाद मागतात. त्यामुळे पदभरती बाहास्त्रोताद्वारे एखाद्या एजन्सीच्या माध्यमातून नेमण्यासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याच्या विषयाला मंजुरी दिली.