- प्रस्तावित रिंगरोडसाठी प्रशासनाच्या हालचाली; ३० एप्रिलपर्यंत मोजणीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतुक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या रिंगरोडसाठीची मोजणी येत्या ३० एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
पुणे पश्चिम चक्राकार मार्ग (रिंगरोड) राज्य महामार्ग (विशेष क्रमांक -१) म्हणून राज्य शासनाकडून महामार्ग महाराष्ट्र अधीनियम १९५५ अन्वये घोषित केला आहे. राज्य महामार्गासाठी जमिनीच्या भूसंपादनाच्या अधिसूचनाही राज्य शासनाने निर्गमित केली आहे. चक्राकार (रिंगरोड) च्या मोजणी व भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने मंगळवार (दि.२३) रोजी रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आढावा घेतला.
पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड) च्या मोजणी प्रक्रियेला गती देण्यासोबतच ३० एप्रिलपर्यंत मोजणी प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुणे पश्चिम चक्राकार ( रिंगरोड ) ची मोजणी सुरू करण्यापूर्वी गावातील नागरिकासोबत बैठक घेवून त्यांना प्रकल्पाची रुपरेषा सांगावी तसेच नागरिकांना असणाऱ्या शंकाचे समाधान करावे, जेणेकरून भुसंपादन, मोजणी प्रक्रियेला गती मिळेल.