- सदनिकेच्या अर्ज मागणीस १८ एप्रिलपर्यंत मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेक्टर १२ येथील प्रधानमंत्री आवासांतर्गत गृहप्रकल्पासाठी अर्जास १८ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. जवळपास साडेचार हजार घरे उपलब्ध होणार आहेत. ३० मार्च रात्री बारापर्यंत त्याची अंतिम मुदत होती. मात्र, त्यास लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मुदतवाढ मागितली असल्याने प्राधिकरणाने त्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
सद्यस्थितीत २० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रशासनास त्याहून अधिक अर्ज येण्याची अपेक्षा होती. अल्प उत्पन्न व आर्थिक दुर्बल घटकांसाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाईन अर्ज मागितले होते. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत अंतिम वेळ देण्यात आली होती. सद्यस्थितीत २६ हजार नागरिकांनी त्याची नोंदणी केली असून, २० हजार अर्ज आले आहेत.
मात्र, आणखी १८ दिवस मुदतवाढ दिली असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज भरण्यासाठी १८ एप्रिलपर्यंत तर, सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज १९ एप्रिलपर्यंत भरता येईल, तर त्या प्रकल्पाची सोडत ७ मे रोजी सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार आहे. सदनिकेसाठी ऑनलाईन अर्ज व इतर अटींमध्ये कोणातही बदल केला नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी सांगितले.