- उद्योग दुस-या राज्यात स्थलांतरित करणे अथवा बंद करणे असे दोनच पर्याय लघुउद्योग संघटनेपुढे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसें.) :- महावितरणने नुकतीच केलेली वीजदरवाढ व औद्योगिक ग्राहकांची बंद केलेली पॉवर फॅक्टर पेनल्टी यामुळे वीजबिलात २० टक्के ते २५ टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. याबाबत उद्योगांना अनुकूल असे निर्णय घेण्यात न आल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने दिला आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजच्या फोर्ट येथील सभागृहात वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत चर्चासत्र व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज मुंबईचे संयुक्त सचिव मुकुंद माळी, ठाणे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अशोक पेंडसे व संपूर्ण राज्यातील जिल्हावार प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार महावितरणने नुकतीच केलेली वीजदरवाढ व औद्योगिक ग्राहकांची बंद केलेली पॉवर फॅक्टर पेनल्टी यामुळे वीजबिलात २० टक्के ते २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून, याचा राज्यातील लघु व मध्यम उद्योगावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. आधीच औद्योगिक मंदीमुळे उद्योजक मेटाकुटीला आला असून, या वीज दरवाढीमुळे तसेच सात टक्के फॅक्टर पेनल्टीमुळे उद्योग दुस-या राज्यात स्थलांतरित करणे अथवा बंद करणे असे दोनच पर्याय उद्योगापुढे आहेत.
विदर्भात राज्य सरकारने वीजदरात अनुदान दिले असून, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र येथील वीज दरात १० टक्के फरक असून विदर्भात वीज १० टक्के स्वस्त आहे. विदर्भात वेगळा वीजदर व उर्वरित महाराष्ट्राला वेगळा वीज दर असा भेदभाव सरकारकडून केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये १५ जानेवारी २०१९ च्या आत पिंपरी-चिंचवडमधील सर्व औद्योगिक व्यापारी संघटनांची पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या नेतृत्वाखाली समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार असून, २० ते ३१ जानेवारी २०१९ या काळात आंदोलन करण्यात येणार असून, त्यासंदर्भात सूचना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पिंपरी-चिंचवड लघुउदयोग संघटनेच्या २/३ सदगुरु प्लाझा, थरमॅक्स चौक, चिंचवड येथील कार्यालयात लेखी स्वरुपात आणून द्याव्यात, असे आवाहन संघटेनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केले आहे.










