न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- शहरामधील कोविड १९ विषाणूची बाधा झालेल्या गृह विलगीकरणामधील रुग्णांना खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामार्फत वैद्यकीय सल्ला तसेच उपचार पुरविण्याचे नियोजन करण्याबाबत महापालिका आणि इंडियन मेडीकल कौंसिलच्या प्रतिनिधीं समवेत आज बैठक संपन्न झाली.
इंडियन मेडीकल कौंसिलच्या प्रतिनिधीं समवेत आज आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के अनिल रॉय, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, इंडियन मेडीकल कौंसिलतर्फे अध्यक्ष डॉ.संजीव दाते, डॉ.दिलीप कामत, डॉ.सुहास माटे, डॉ.संजय देवधर, डॉ.उमा भालेराव, डॉ.मंदार डोईफोडे उपस्थित होते. होम आयसोलेशन मध्ये असणा-या रुग्णांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा यादृष्टीने बैठकीत चर्चा होऊन नियोजन करण्यात आले.
कोरोना बाधित झाल्यानंतर गृहविलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तीने सर्वप्रथम किमान १ वेळा खाजगी वैद्यकीय अधिका-याकडे भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील १० दिवस ठराविक वेळेमध्ये दुरध्वनीद्वारे अथवा व्हिडिओ कॉलद्वारे या वैद्यकीय अधिका-यासमवेत कन्सल्टेशन करण्याची सुविधा या रुग्णाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे गृहविलगीकरणातील व्यक्तींना आवश्यकता भासल्यास तातडीने उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यास मदत होणार आहे. सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना इंडियन मेडीकल कौंसिलमार्फत याबाबत आवाहन करण्यात येणार असल्याचे डॉ. दिलीप कामत यांनी यावेळी सांगितले. तसेच महापालिकेस सहकार्य करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांचे कन्सल्टेशन चार्जेस संबंधितांनी अदा करण्याचे व आवश्यकतेनुसार गृहविलगीकरणातील रुग्णास रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासल्यास महापालिकेमार्फत संबंधित वैद्यकीय अधिका-यास सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकांस प्रतिदिन कमाल २० रुग्णांना सेवा देण्याची मुभा राहील असेही डॉ.कामत यांनी सूचित केले.
या चर्चेनुसार इंडियन मेडीकल कौंसिलमार्फत महापालिकेकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असून त्याकामी आवश्यक ती संपूर्ण प्रक्रिया निश्चित करुन नागरिकांना वरीलप्रमाणे सुविधा महापालिका व इंडियन मेडीकल कौंसिल यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच त्यानुसार सेवा देणा-या वैद्यकीय व्यावसायिकांची नावे व संपर्क क्रमांक प्रसिध्द करण्यात येतील. या कामी महानगरपालिकेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.