- पालिकेच्या उत्पन्नात मासिक तीन लाखांची भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१० एप्रिल २०२१) :- पिंपरीतील क्रोमा इमारतीशेजारील अंध – अपंगासाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या वाहनतळाची जागा ११ महिने भाड्याने देण्यात येणार आहे. महापालिकेला ३ लाख ९० हजार रुपये भाडे मिळणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या जागा आणि इतर मालमत्तांना ११ महिने कालावधीकरिता भाड्याने वितरित करण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
‘ह ‘ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत पिंपरी येथील क्रोमा इमारतीशेजारी महापालिकेची वाहनतळाची जागा आहे. ही जागा अंध व अपंगासाठी राखीव असल्याबाबत भूमी आणि जिंदगी विभागाने १२ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे. स्थापत्य ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयाने या वाहनतळाच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ १३५० चौरस मीटर असून, त्यामध्ये ५४ दुचाकी आणि ३५ चारचाकी वाहने पार्किंग करता येतील, या असे कळविले आहे.
ही वाहनतळाची जागा सीमाभिंतीसह प्रवेशद्वार करून बंदिस्त करण्यात आली आहे. नगररचना विभागाने मासिक ‘ ह ‘ भाडेदर ९.२० चौरस फूट कळविला आहे. या वाहनतळाच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ १४ हजार ५२६ चौरस फूट आहे. त्यानुसार, दर निश्चिती केल्यास मासिक भाडे १ लाख ३३ हजार ६३९ रुपये अधिक जीएसटी असे १ लाख ५७ हजार रुपये इतके येत आहे. वाहनतळ ११ महिन्याकरिता भाड्याने देण्यासाठी ह क्षेत्रीय कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले. त्यामध्ये सहा नागरिकांनी सहभाग घेतला. त्यात महापालिकेने जाहीर केलेल्या दरापेक्षा औंध येथील राजीव काटे यांनी ३ लाख ३० हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी, असा इतर नागरिकांपेक्षा अधिकतम दर सादर केला. काटे यांनी ३ लाख ३० हजार रुपये अधिक जीएसटी आणि चार महिन्यांची अनामत १ लाख २० हजार रुपये, अशी ५ लाख १ हजार ४०० रुपये रक्कम आगाऊ भरली आहे.