माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. २४ डिसें.) :- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात १९६८ ते २०१८ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत महाविद्यालयीन आठवणी जागवल्या. महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी आपली मनोगते सादर केली, एकमेकांसोबत सेल्फी काढले, ग्रुप फोटो काढले, तसेच स्नेहभोजनाचा आस्वादही लुटला.
इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेने हा स्नेहमेळावा भरविण्यासाठी पुढाकार घेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे होते.
यावेळी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, नगरसेवक सुनिल शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष गोरख काळोखे, कार्यवाह रामदास काकडे, विश्वस्त मुकुंदराव खळदे, चंद्रकांत शेटे, शैलेश शहा, दीपक शहा, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. बी.बी. जैन, निरुपा कानिटकर आदींसह गेल्या ५० वर्षातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केक कापण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी संघटनेने काढलेल्या ‘स्मरण इंद्रायणीचे शब्द कृतज्ञतेचे’ या सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
काळ बदलतो त्याबरोबर परिस्थिती बदलते. मात्र, वर्गमित्रांनी बदलू नये, एकोपा कायम ठेवावा, संघटनात्मक वृत्तीने समाज उन्नतीची कामे करावीत असा आशावाद माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी संघटना मजबूत केल्याने स्नेह बळावेल व गतकाळची मैत्री पूर्ववत होईल असेही यावेळी सांगितले. गुरूजनांच्या हस्ते सरस्वती पूजन करून मेळाव्यास सुरूवात झाली. त्याचबरोबर या पन्नास वर्षाच्या कालावधीत दिवंगत झालेल्या माजी विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. एकमेकांना भेटणार्या या चाळिशी ते साठी पार केलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर महाविद्यालयीन मित्र मैत्रिणींच्या भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता.
महाविद्यालयीन जीवनातील काही गमती जमती सांगत अनेकांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. स्नेहभोजना नंतर घेतलेला फिश पॉण्डचा कार्यक्रम हास्याच्या फवार्यात धमाल उडवून गेला. काहींनी त्यावेळी आवल्यावर पडलेले फिश पॉण्डच्या आठवणी सांगितल्या. त्यानंतर सर्व अनौपचारिक गप्पांमध्ये रममाण झाले. उत्सुकता, आनंद, आश्चर्य, कौतुक, मस्ती अशा संमिश्र भावना चेहर्यावर दिसत होत्या. या मित्र मैत्रिणींनी यापुढेही व्हॉटसॅप, फेसबुक व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा संकल्प केला. गरजेनुसार महाविद्यालयास आवश्यक ती मदत करण्याचे मनोदय विदयार्थांनी व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे यांनी सांगितले, महाविद्यालयाने गेल्या पन्नास वर्षात संस्काररुपी शिक्षण दिले आहे. त्यामुळेच या महाविद्यालयाचे विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात मोठ्या पदांवर दिसतात. उद्याचे नागरीक घडविण्याचे कार्य शिक्षणव्यवस्था करीत असते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अभिनेत्री पूजा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना चित्रपट पदार्पनातील आठवणी जागवत चित्रपटाबरोबरच संसारही यशस्वीपणे केल्याचे सांगितले. रामदास काकडे यांनी महाविद्यालयाच्या इतिहासाला उजाळा देत सद्यस्थिती कथन केली. सुनिल शेळके यांनीही आपल्या छोटेखानी भाषणातून संपूर्ण सभागृहाला हास्यकल्लोळात लोटले. आमदार बाळा भेगडे यांनीही आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
प्रास्ताविक चंद्रभान खळदे यांनी केले. सूत्रसंचालन दशरथ जांभुळकर यांनी, तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानले.
कार्यक्रमात बोलताना अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे.










