न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसें.) :- रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बंधा-याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्रात धोक्याची पाण्याची पातळी तपासण्यात येणार असून, त्यासाठी थेट पद्धतीने काम दिले जाणार आहे. याकरिता ड्रोन सर्वेक्षण करुन त्या कामास साडेपाच लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तत्कालीन लोकसंख्येनुसार पाणीवापर, तसेच भविष्यात होणारी लोकसंख्यावाढ लक्षात घेऊन बांधला होता. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकांत महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्यावाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून येते. रावेत बंधाऱ्याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे.
रावेत येथील बंधा-यातून महापालिका ४८० एमएलडी, एमआयडीसी १२० एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ३० एमएलडी उपसा करते. बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधा-याची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येते. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने साठवणूक क्षमता कमी असल्याचे पाटंबधारे विभागाच्या अधिका-यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. या संदर्भात महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांची बैठक झाली आहे.










