- बुधवारी मध्यरात्रीपासून पंधरा दिवस ‘लॉकडाउन’चे संकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२१) :- राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्याची सरकारची पूर्ण तयारी झाली असून, १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होईल, अशी खात्रीलायक माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. हे लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत असेल.
सार्वजनिक वाहतुकीवर पूर्णतः बंदी घातली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यावर कठोर निर्बंध राहणार असून केवळ अत्यावश्यक प्रवासाचीच मुभा राहील, असे सांगण्यात येते. राज्यातील गरीब व मजूर कामगारांसाठी काही प्रमाणात मदतीचे पॅकेज देण्यासाठी आज दिवसभर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा केली.
आज गुढीपाडवा आणि उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे सरकारने १४ एप्रिलच्या मध्यरात्री पासूनच लॉकडाउन करण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांनी लॉकडाउनची मानसिकता तयार करावी, अशा प्रकारचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. या लॉकडाउन च्या दरम्यान आरोग्याच्या संपूर्ण सुविधांची क्षमता वाढवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न होणार असून, दर दिवशी राज्यात ६ ते ७ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
















