- जम्बो रुग्णालयात तीन शिफ्टमध्ये चालणार कामकाज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोविड १९ प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर समन्वय अधिकारी व नोडल अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.
अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड सेंटरकरीता बाळासाहेब खांडेकर, सहाय्यक आयुक्त यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तथापि, कामकाजाची व्याप्ती विचारात घेता आणखी अधिका-यांची नियुक्ती करण्याची बाब विचाराधीन आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड सेंटर करीता यापुर्वी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांची मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती कायम ठेवून त्यांच्या मदतीकरीता सुनिल दासराव अलमलेकर व प्रशांत जोशी सहाय्यक आयुक्त, यांची देखील समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
या तीन अधिका-यांनी ३ शिफ्टमध्ये जम्बो कोविड सेंटर येथील समन्वय अधिकारी म्हणून कामकाज करावे. तसेच २४x७ एक समन्वय अधिकारी उपस्थित असतील याची काळजी घ्यावी. तसेच यापूर्वी प्रस्तुत अधिका-याच्या कोविड १९ सबंधी नियुक्त्या केल्या असतील त्या कामकाजासह सदरचे आदेशानुसार सोपविण्यात आलेले कामकाज करावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त १ यांनी दिले आहेत.


















