- विकेंड लॉकडाऊनचा परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधाचे पालन करत, शहरातील पिंपरी व मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारातील व्यवहार सुरु ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये महापालिका प्रशासनाच्या नियमावलीनुसार वीकेंडला शनिवारी व रविवारी या दोन्ही उपबाजारांमधील खरेदी – विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पत्र बाजार समितीचे पिंपरी विभागप्रमुख राजू शिंदे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत पिंपरी व मोशी उपबाजारांचे व्यवहार होतात. बाजार समिती सोमवार ते शुक्रवार नियंत्रित गर्दीत सुरू राहणार आहे. तर शनिवार, रविवार हे दोन दिवस संपूर्णपणे बंद राहणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशामुळे शनिवार – रविवार शहरातील व्यवहार बंद असणार आहेत. नव्या नियमावलीनुसार मोशी उपबाजार समितीमधील पहाटे चार ते ते सकाळी अकरा पर्यंत सुरू राहणार आहे. तर पिंपरी बाजारातील व्यवहाराकरिता पहाटे पाच ते सकाळी नऊ ही वेळ ठरवून देण्यात आली आहे.
मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारात प्रामुख्याने खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, संगमनेर, नाशिक या भागातील शेतकरी माल विक्रीसाठी येत असतात. तर पिंपरीत मावळ, मुळशी व हवेलीतील शेतकरी माल विक्री करतात. पिंपरी – चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत अनेक निर्बंध लावले आहेत. तसेच त्यानंतर महापालिका प्रशासनानेदेखील नियमावली जाहीर केली आहे. या सर्व निर्बंधांना अनुसरून या दोन्ही बाजारांमधील व्यवहार केले जाणार आहेत.


















