- ताप, अंगदुखी, खोकल्यावर फिव्हर क्लिनिकमधील डॉक्टरांचा सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालय हे कोविड रूग्णासाठी वरदान ठरत आहे. रूग्णालयात कोविड संशयित आणि कोविड बाधित रूग्णांसाठी सुसज्ज फिव्हर क्लिनिक ची व्यवस्था करणेत आली आहे. ताप, अंगदुखी, खोकला तथा कोरोना आजाराची इतर लक्षणे असणा-या रुग्णांना प्रथमत: येथिल फिव्हर क्लिनिक मधील डॉक्टरांमार्फत तपासले जाते.
कोविड संशयित रुग्णांना तात्काळ ऍटिजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करणेत आली आहे. यशवंतराव चव्हाण रूग्णालयाची आरटीपीसीआर प्रयोगशाळा आणि मनपाच्या यंत्रणा तत्पर कार्यरत आहेत. रूग्णालयाच्या आवरात सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत संशयित तथा बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे समुपदेशन करणेकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन करणेत आला आहे.
रुग्णालयात येणा-या कोविड बाधित रूग्णांसाठी अहोरात्र स्वतंत्र प्राथमिक निर्धारण कक्ष (TRIAGE) तयार करणेत आले आहे. या विभागात कोविड बाधित रूग्णांची तपाणी करून रूग्णांच्या लक्षणानुसार तात्काळ या विभागात उपचार केले जातात. अस्वस्थ रूग्णांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था या विभागात करणेत आली आहे. तसेच जे रुग्ण कोविड बाधित असून मात्र लक्षणे सौम्य आहेत अशा रुग्णांना गृहविलगीकरणासाठी समुपदेशन देखील केले जात आहे. रुग्णालयात सद्यस्थितीत रूग्णांची जादा गर्दी असून रुग्णालयातील सबंध कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स व इतर स्टाफ रुग्णांच्या तत्पर आणि योग्य उपचारासाठी कार्यरत आहेत. रूग्णालयात कोविड संशयित १०९ आणि कोविड बाधित ५०८ रूग्ण आहेत. तसेच ऑक्सिजन बेड ३६०, आयसीयु व्हेंटिलेटर बेड ७१ उपलब्ध असून सद्यस्थितीत हे पूर्णपणे भरलेले आहेत. कोविडच्या प्रथम लाटेपासून आजपर्यंत २२७८१ अंतररूग्णांवर या रूग्णालयामार्फत यशस्वीपणे उपचार करणेत आले आहेत. त्यापैकी २१७३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांसाठी आवश्यक असणारी सर्व उपचार प्रणाली मोफत उपलब्ध असून गरजू रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. यासाठी रक्तदान, प्लाझ्मादान आणि प्लाझ्मा विलगीकरणाची चोख व्यवस्था यशवंतराव चव्हाण रूग्णालय रक्तपेढीत करणेत आली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयाचे सर्व डॉक्टर्स, अध्यापक आणि सर्व कर्मचारी वर्ग अत्यंत चोख आणि प्रभावीपणे कोविड रूग्णांच्या उपचारासाठी झटत आहेत, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.


















