- कांदा निर्यातीची दहा लाखांपेक्षा अधिकची रक्कम लटकली …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- ईमेल आयडीवरून संपर्क साधून दुबईतील व्यापाऱ्याने २९ टन कांदा आयात केला. त्यानुसार चिंचवड येथील व्यापायाने कांद्याची निर्यात केली. मात्र त्याचे १० लाख ८२ हजार रुपये न देता फसवणूक केली. याप्रकरणी दुबई येथील व्यापा-यासह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथे १५ फेब्रुवारी ते १७ एप्रिल २०२१ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
जबेल अल नजर फूड स्टफ ट्रेडिंग कंपनीचे मालक दुर्गाप्रसाद कुना (मूळ रा. आंध्रप्रदेश), कार्यकारी व्यवस्थापक आनंद देसाई (मूळ रा. औरंगाबाद), खरेदी समन्वयक अख्तर (रा. दुबई), अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. चेतन राजेंद्र मारणे (वय २८, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली ठाण्यात शनिवारी (दि.१७) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना मेल करून संपर्क केला. कांदा मालाची आयात करण्याची आरोपींनी फिर्यादीकडे विचारणा केली. त्यानुसार फिर्यादीने दुबई येथील जबेल अल नजर फूड स्टफ ट्रेडिंग कंपनीच्या नावे २९ टन कांदा निर्यात केला. त्याची किंमत १४ हजार ९३५ डॉलर असून भारतीय चलन याप्रमाणे १० लाख ८२ हजार ४० रुपये एवढी आहे. निर्यात केलेल्या कांद्याचे पैसे फिर्यादी यांनी वारंवार मागितले. मात्र आरोपींनी आजपावेतो पैसे न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे तपास करीत आहेत.