- पैशांची अडचण सांगून वाहनं गहाण ठेवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी तब्बल ३५ दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. त्यांनी या दुचाकी पुणे, लातूर, जालना, धुळे, अहमदनगर या जिल्ह्यांतून चोरल्या. कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून मिळतील तेवढे पैसे घेऊन मौजमजा करत होते. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने या टोळीला पकडले असून, ३३ लाख रुपये किमतीच्या ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत.
संकेत आनंदा धुमाळ (वय २२, रा. मु.पो. खडकवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), श्रीकांत बाबाजी पटाडे (वय २३, रा. मु.पो. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे), सुनील आबाजी सुके (वय २६, रा. खडकवाडी).
पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना माहिती मिळाली की, भोसरी येथे दोघेजण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार सापळा लावला. मात्र चोरटे तिथे आले नाहीत. त्यातील एकजण आंबेगाव येथील असल्याची माहिती पोलिसांनी काढली आणि दरोडा विरोधी पथकाच्या एका टीमने थेट आंबेगावला जाऊन संकेत धुमाळला ताब्यात घेतले. धुमाळकडे चौकशी करून त्याचा दुसरा साथीदार श्रीकांत पटाडे आणि नंतर सुनील सुक्रे याला ताब्यात घेतले. सुनीलवर यापूर्वी तीन वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस कोठडीत असताना केलेल्या तपासात तिन्ही चोरट्यांनी ३५ दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी ३५ दुचाकी शनि शिंगणापूर (अहमदनगर), आळेफाटा, आंबेगाव, शिरूर येथून जप्त केल्या. आरोपी संकेत धुमाळने अॅटोमोबाइलचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो सुपा येथे एका कंपनीत काम करीत आहे. श्रीकांत पटाडे ट्रॅक्टर चालविण्याचा व्यवसाय करतो. आरोपी सुनिल सुक्रे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करीत होता. त्याने या पूर्वी १० दुचाकी वाहने चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वाहने चोरून ती यातील आरोपी श्रीकांत याच्या मार्फत गि-हाईक शोधून त्यांना १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत विकत असे. गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगून काही वाहनांवर स्वतः च्या गाडीची नंबर प्लेट टाकून, पैशांची अडचण असल्याचे कारण सागून वाहने गहाण ठेवीत असे.