- कोविड चाचणीतून सूट देण्याची लघुउद्योग संघटनेची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- कामावर रुजू होताना आरटीपीसीआर कोविड चाचणी औद्योगिक कामगार व कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र या चाचणीचा अहवाल प्राप्त होण्यास काही दिवसांचा कालावधी लागत आहे. त्याचा फटका अपुऱ्या मनुष्यबळावर कशाबशा सुरु असलेल्या उद्योगांना बसत आहे. त्यामुळे कारखान्याच्या गेटवर कामगारांची दररोज होणारी ऑक्सिजन व शारीरिक तापमान तपासणी ग्राह्य धरून, औद्योगिक कामगारांना कोविड चाचणीतून सूट मिळावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात हजारो सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. काही उद्योग हे फार्मसी, अत्यावश्यक सेवा तसेच काही शेतीशी संबधित यंत्र सामुग्री बनविणारे आहेत. सर्वच उद्योजक हे करोना काळात कामगारांची काळजी घेत आहेत. कामगारांना मास्क शिवाय कामावर घेतले जात नाही, कामावर आल्यानंतर आणि घरी जाताना कंपनीच्या गेटवरच त्यांची ऑक्सिजन व तापमान तपासणी केली जाते. सध्या करोना चाचणीचे नमुने घेतले असता त्याचा रिपोर्ट मिळण्यास साधारणपणे पाच दिवसांचा कालावधी लागतो किंवा चाचणी करण्यास गेल्यास किट उपलब्ध नाहीत, असे सांगितले जात आहे. परिणामी ही चाचणी लांबत आहे. त्यामुळे कामगारांना कामावर रुजू होणे शक्य होत नाही.
गतवर्षीच्या लॉकडाऊनमधून सावरत असतानाच पुन्हा आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे परराज्यातील मनुष्यबळ गावी परतले आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात कारखान्यांमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवावी लागत आहे. मात्र चाचणी केंद्रांवर चाचणी किट उपलब्ध नसणे, अहवाल मिळण्यास होणारा विलंब तसेच खासगी चाचणी केंद्राचे दर कामगारांना परवडणारे नसल्याने शरीराचे तापमान आणि शरीरातील ऑक्सिजन पातळीच्या मोजमापावर कामगारांचा कारखान्यातील प्रवेश ग्राह्य धरण्याची मागणी या निवेदनात केली आहे. याशिवाय औद्योगिक परिसरात चाचणी केंद्र उभारून कामगारांची मोफत चाचणीची व्यवस्था प्रशासनाने करावी. त्याकरिता पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना सर्वतोपरी मदत करीन, अशी ग्वाही या निवेदनात दिली आहे. तसेच या चाचणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणीही केली आहे.
















