ई -पॉस मशीन तहसीलदार कार्यालयात जमा करणार – विजय गुप्ता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :-राज्यातील रास्त भाव दुकानदार यांना स्वतःचा अंगठा अधिप्रमाणित करून लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास परवानगी न दिल्यास वितरण बंद करत, ई – पॉस मशीन तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करणार असल्याचा इशारा ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशनचे अध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर खजिनदार विजय गुप्ता यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, संपूर्ण जगाला कोविड वैश्विक महामारीने नागरिकांना ग्रासले आहे. करोना प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील रेशनिंगधारकांना या दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्य पुरविण्यात आले. सध्या राज्यात करोनाची दुसरी लाट आली असून, करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेली वर्षभरापासून करोना प्रादुर्भावाच्या काळात धान्य वितरित करताना राज्यातील रेशनिंग दुकानदार बाधित झाले.
अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर प्रत्येक दुकानदारांना ५० लाखांचे आरोग्य वीमा कवच देण्याच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर्स फेडरेशनच्या वतीने वेळोवेळी नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास रास्त भाव रेशन दुकानदारांना स्वतःचे अंगठे अधिप्रमाणित करून धान्य वितरण करण्यास परवानगी देणेबाबत विनंती अर्ज केले आहेत. परंतु, या विभागामार्फत नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहेत.
राज्यातील रास्त भाव रेशर्निग दुकानदार अशा परिस्थितीत आतापर्यंत वितरण करत आले आहेत. परंतु बाधितांची उच्चांक संख्या पाहता राज्यातील रास्त भाव रेशनिंग दुकानदार याना जर स्वतःचे अंगठे अधिप्रमाणित करून धान्य वितरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत आहेत. याशिवाय गतवर्षी मोफत वितरित केलेल्या धान्याचे कमिशन अजूनही रेशनिंग दुकानदारांना मिळाले नाही. यामुळे यापूढे दुकानदारांचे उरलेले कमिशनचे पेसे रास्त भाव रेशन दुकानदार यांना मिळत नाहीत तोपर्यत हे दुकानदार धान्याचे वितरण थाबविणार असून, ई -पॉस मशीन तहसीलदार कार्यालयात जमा करणार आहेत.
















