न्युज पीसीएमसी नेटवर्क : चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत 2 हजार, 355 मतदार वगळले जाणार आहेत. या सर्व मतदारांची यादी महापालिकेच्या वेबसाईटवर व चिंचवड विधानसभा मतदार संघ कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपले नाव वगळण्यास हरकत असलेले मतदार येत्या 30 ऑगस्टपर्यंत हरकत नोंदवू शकणार आहेत. योग्य कागदपत्रे व पुराव्यासह या हरकती चिंचवड विधानसभा मतदार संघ, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, दुसरा मजला, थेरगाव येथे नोंदविल्या जाणार आहेत.
चिंचवड विधानसभा मतदार संघात केंद्रस्तरिय अधिकारी (बी.एल.ओ.) यांनी समक्ष पाहणी करून अहवाल प्राप्त केले आहेत. यामध्ये 977 मयत, 767 दुबार आणि 611 स्थलांतरित असे एकूण 2 हजार 355 मतदार आढळले आहेत. या सर्व मतदारांना मतदार यादीतील नाव कायम ठेवण्याची संधी देण्यात आली आहे. येत्या 30 ऑगस्टपर्यंत कागदपत्रांसह ही हरकत नोंदविता येणार आहे












