- कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा करणाऱ्या टॅंकचे ऑडिट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२१) :- नाशिक येथे झालल्या दुर्घटनेनंतर पिंपरी – चिंचवड महापालिकेने खबरदारीची पाऊले उचलली आहेत. शहरातील जम्बो कोविड हॉस्पिटलसह सर्वच कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा करणाऱ्या टॅकचे ऑडिट करण्यात आले. हे टॅंक सुरक्षित असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. तर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी अग्निशमन विभागाने वाहन ठेवले आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेने खबरदारी म्हणून ऑक्सिजन टॅंकचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. सध्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये २२ हजार किलो लिटर व १० हजार किलो लिटरचे दोन टॅंक आहेत. ऑटो क्लस्टर येथे १० हजार किलो लिटरचा एक टॅंक आहे. या टॅंकचे फायर ऑडिट अग्नीशमन विभागाने केले. हे टॅंक सुरक्षित असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. शहरातील सर्वच खासगी कोविड रूग्णालयाचे देखील ऑडिट करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून ऑक्सिजनच्या टॅंक असणाऱ्या ठिकाणी अग्निशमन विभागाने वाहन ठेवले आहे. आगीची तसेच नाशिकसारखी घटना होऊ नये याची खबरदारी अग्निशमनचे कर्मचारी घेत आहेत.
अग्निशामक विभागाच्या सूचना
टॅंकमध्ये ऑक्सिजन भरताना योग्य काळजी घ्यावी. ऑक्सिजन भरणाऱ्यांनी गडबड करू नये. ऑक्सिजन टॅंकच्या क्षमतेपेक्षा जास्त दाबाने भरल्यास आतील पाईप फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस लिक होऊन दुर्घटना घडते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त भरू नये, अशी सूचना अग्निशमन विभाग करत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनच्या टॅंकची देखील तपासणी केली. सध्या त्या सुरक्षित आहेत. त्यात गॅस भरताना काळजी घेणे गरजेचे आहे.
-किरण गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी…