- ऑक्सिजन निर्मितीची अफाट क्रयशक्ती असतानाही त्या कंपन्या हतबल..
- जिल्हा कार्यालय, एफडीएचा कारभार दिशाहीन – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२१) :- मेडिकल लिक्विड ऑक्सिजन मिळाला की तुम्हाला गॅस भरून देतो, अश्या आश्वासनावर शहरातील अनेक हॉस्पिटल्स सध्या दिवस काढत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून म्हणजेच ७२ तासाहून अधीक वेळ निघून गेला आहे. परंतु शहर परिसरातील ऑक्सिजन रिफिलिंग व निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना लिक्विड ऑक्सिजन गॅसचा पुरवठा पुरेसा उपलब्ध होतच नाही. त्यांना ४० टनापेक्षा जास्त क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन गॅस हवा असताना त्या कंपन्यांना, मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा देऊन बोळवण केली जात आहे.
गेल्या १५ दिवसाचा लेखाजोखा पाहिला तर शहरातील मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करणारे सहा कारखाने प्रामाणिकपणे दिवस रात्र रिफिलिंग करण्याचे काम करताना दिसून येत आहेत. त्यांच्यामुळे शहर व ग्रामीण परिसरातील हॉस्पिटल्सला ऑक्सिजन मिळत आहे. परंतू, एफडीए आणि जिल्हा प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका आता ह्या कंपन्यांना बसत आहे. गेल्या तीन दिवसापासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ह्या कंपन्यांना अतिशय कमी लिक्विड ऑक्सिजन पुरवठा होत असल्यामुळे शहरातील अनेक हॉस्पिटल्सला आता ऑक्सिजन विनाच रहावे लागेल, त्याचा थेट परिणाम आता कोरोना बाधित रुग्णांच्या जीवाशी होणार यात शंका नाही.
शहरातील मृत्यू दर वाढण्याचे एक कारण आता ऑक्सिजनचा अभाव हेच असणार आहे. येत्या आठवड्यात ऑक्सिजन अभावी मृत्यूचे प्रमाण वाढण्याचे स्पष्ट संकेत हॉस्पिटल्सने दिलेले आहेत. लिक्विड ऑक्सिजन अभावी सदरच्या रिफिलिंग कंपन्या मात्र रडकुंडीला आल्या आहेत. मोठी मागणी असूनही त्या कंपन्याना शक्य असूनही लिक्विड ऑक्सिजन अभावी ऑक्सिजनचा पुरवठा देऊ शकत नाहीत. दरोरोज ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना बाधित रुग्ण अत्यव्यस्थ होत आहेत.
पुणे जिल्ह्याला १५० टन लिक्विड ऑक्सिजनची दररोज आवश्यकता आहे. मात्र, १० टक्केसुद्धा लिक्विड ऑक्सिजन पुरवठा शहराला मिळत नाही. ही अतिशय दुर्दैव्याची व खेदाची गोष्ट आहे. इतर जिल्ह्यात पुण्याच्या कोट्यातील लिक्विड ऑक्सिजन पळविण्याच्या घटनेतसुद्धा वाढ झालेली आहे. मात्र कागदावर काहीही अलबेल नसल्याचा दावा प्रशासन करतय. कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटकाळी प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे. मोठ्या प्रमाणात रीफीलिंग क्षमता असूनही कंपन्याना मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करणे अशक्य होत आहे. याला जिल्हा अधिकारी कार्यालय, प्रशासन व एफडीएच पूर्णतः दोषी आहे.
– विजय पाटील – अध्यक्ष प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती….