- कोरोनाने मृत २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून नेले स्मशानभूमीकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१) :- बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावर कहर म्हणजे रुग्णवाहिकाच नसल्याने मृतदेहांना एकावर एक टाकून स्मशानभूमीत न्यावे लागत असल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे.
जिल्हा प्रशासनाला चिठ्ठी लिहून अतिरिक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अजून कोणताही रुग्णवाहिका मिळालेली नाही, असं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.