- स्वखर्चातून सर्वांना देणार मोफत कोविड १९ लस..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- कोरोनाच्या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरणार आहे. राज्य सरकार १ मे २०२१ पासून देशातील १८ ते ४५ वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र, शासनाच्या वितरणावर पूर्णपणे अवलंबून न रहाता पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने स्वतंत्रपणे लस उत्पादक कंपन्यांशी संपर्क करुन थेट पद्धतीने लस खरेदीची तयारी करावी, असा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या वतीने ५५ आणि खासगी ११ केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरात साधारणता: २५ लाख लोकसंख्या आहे. प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक लस दोन वेळा घ्यावी लागते.
शहरातील सर्व नागरिकांना मोफत लस उपलब्ध करुन दिल्यास जास्तीत जास्त नागरीक लस घेतील आणि कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. यासाठी पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील १८ ते ४५ वर्ष वयोगटातील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याबाबत आज बुधवारच्या (दि. २८ एप्रिल) स्थायी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
















