तब्बल नऊ दारूअड्डे उद्धवस्त; अकरा जणांवर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२१) :- पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दारू अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी सुरूच आहे. मंगळवारी (दि. २७) एकाच दिवशी ९ ठिकाणी कारवाई करीत एकूण ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख ६७ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहिल्या कारवाईत देविदास बाबूराव मिस्ता (३८, रा. नानापेठ) याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मिस्ता एमआयडीसीत रेड्डीज हैदरावादी बिर्याणी हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून चौदा हजार ११५ रुपयांची विदेशी दारू जप्त केली. दुसऱ्या कारवाईत निगडी येथील मारुती गुंडप्पा पवार (४८, रा. ओटास्कीम, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पवार हा ओटास्कीममध्ये हातभट्टी विक्री करीत होता. याची खबर लागताच पोलिसांनी छापा मारून त्याच्याकडून दोन हजार रुपये किंमतीची २० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तिसऱ्या कारवाईत प्रिया त्रिशूल कंजारभट (२४, रा. तुपेवस्ती, मोशी) हिच्यावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रिया ही देखील हातभट्टी दारूची विक्री करीत होती. पोलिसांनी कारवाई करीत तिच्याकडून दोन हजार रुपये किंमतीची २० लिटर दारू जप्त केली.
चौथ्या कारवाईत ऋतिक काळूराम कंजारभट (२२ रा. बो-हाडेवस्ती, मोशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ऋतिक हा बो-हाडेवस्ती हातभट्टी दारू विकत होता. पोलिसांनी त्याच्याकडूनही २० लिटर दारू जप्त केली आहे. पाचव्या कारवाईत अर्जुन मोहन थापा (२५, रा. डीलक्स चौक, पिंपरी) याच्यावर पिपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अर्जुन हा भोसरी उड्डाणपुलाखाली दारू विक्री करीत होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. त्यावेळी पोलीसांना त्याच्याकडे पाच हजार ३४० रुपयांच्या ८९ देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. सहाव्या कारवाईत मीना चितामणी भुत (४५, रा. नेहरूनगर पिंपरी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भुते नेहरूनगर परिसरात अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तिच्यावर कारवाई करीत पोलिसांनी तेराशे रुपये किंमतीची २० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. सातव्या कारवाईत विकास बाळकृष्ण सोनवणे (३५, रा. मंगलनगर, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे हा काळेवाडी येथे हातभट्टी दारू विकत होता. पोलिसांनी छापा मारून ७ लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. आठव्या कारवाईत रविशंकर कमलेशकुमार त्यागी (१९, रा. हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी त्यागी हा हिंजवडीतील जयरामनगर येथे दारू विक्री करीत होता. याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी छापा मारून त्याच्याकडून पंधराशे रुपये किमतीच्या २५ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. नवव्या कारवाईत कुंदन प्रकाश नानावत (वय ४५), कुमार रमेश नानावत (वय ४०) आणि अकबर गुलाब मन्नावत (४२ सर्व. शिरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आपसात संगनमत करून पवना नदीच्या कडेला निर्मनुष्य ठिकाणी हातभट्टी दारू तयार करीत होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून सहा लाख ४० हजार रुपये किमतीचे आठ हजार लिटर गूळ मिश्रित रसायन जप्त केले.
















