न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसें.) :- महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या शहरातील ३६ स्मशानभूमी, दफनभूमीची स्थानिक नगरसेवकांसोबत पाहणी केली. त्यातील त्रुटी, समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी अधिका-यांची बैठक घेऊन स्मशानभूमी पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या.
शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, बाबासाहेब गलबले, प्रवीण लडकत, के.डी.फुटाणे, देवन्ना गट्टूवार, दीपक सुपेकर, प्रशांत पाटील, प्रवीण घोडे, श्रीकांत सवणे, नितीन देशमुख, रवींद्र पवार, एकनाथ पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे बैठकीला उपस्थित होते.
महापौर जाधव म्हणाले, ” पर्यावरण रक्षणासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभुमीमध्ये दहन विधीसाठी कमी सरपण, लाकडे लागतील अशी अद्ययावत यंत्रणा, मशिन उपलब्ध करुन घ्यावी. स्मशानभुमीची जागा व लगतच्या डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन त्या विकसित करणे. सर्व स्मशानभूमी, दफनभूमी व दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी ४० कोटीची तरतूद करण्यात यावी.
प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्यक तरतुदी कराव्यात. पाण्याची आरसीसी टाकी बांधणे, विद्युत विषयक सर्व सुविधा पुरविणे, सोलर सिस्टीम बसविणे, विद्युतदाहिनी बसविणे, सर्व दफनभुमीला एकसारखी सिमाभिंत बांधणे इत्यादी कामे तातडीने करण्याच्या सूचना महापौर जाधव यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.










