- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- तक्रारदार तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि चहा पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून महागडे घड्याळ चोरी केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील फौजदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. ३०) त्याबाबतचे आदेश दिले. प्रशांत राजेंद्र रेळेकर असे निलंबित फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.
भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी संबंधित तरुणी २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिंजवडी पोलीस ठाण्यात गेली होती. तक्रार घेतल्यानंतर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. दरम्यान, त्याने गाडीमध्ये तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. आपण कधीही हॉटेलवर जाऊ शकतो. मी तुमच्यासाठी कोणतेही हॉटेल उघडायला सांगेन. मी उद्या मिरजेला चाललो आहे. तू पण माझ्यासोबत चल, असे म्हणाला, त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने रेळेकरला नकार दिला.
गाडी तरुणीच्या घराजवळ पोहचल्यानंतर रेळेकर याने कंटाळा आल्याचे सांगत चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. तरुणीने नाइलाजास्तव रेळेकरला चहा पिण्यासाठी घरात घेतले. त्यावेळी तरुणीची आईदेखील घरात होती. चहा पिताना रेळेकरने चार्जिगला लावलेले अँपल कंपनीचे घड्याळ खिशात घातले. तरुणीने दुसऱ्या दिवशी ठाण्यात धाव घेत वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. वरिष्ठांनी झाडाझडती घेतल्यानंतर रेळेकर याने तरुणीचे घड्याळ परत दिले.
कोणताही अधिकारी सामान्य नागरिकांना त्रास देत असेल, त्यांच्याशी गैरवर्तणूक करीत असल्यास त्यांची गय केली जाणार नाही. माझ्याकडे चुकीला माफी नाही. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.
– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी – चिंचवड.