- पालकांना एसएमएस व व्हॉट्स अपद्वारे निकाल समजणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळांचा निकाल येत्या १० तारखेला जाहीर केला जाणार आहे. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा निकाल पालकांना एसएमएस व व्हॉट्स अपद्वारे कळविण्यात येणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत.
१० तारखेलाच खासगी शाळांनी देखील निकाल जाहीर करावा, असे पत्र महापालिका शिक्षण विभागातर्फे दिले जाणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे विद्याथ्यांचा ग्रुप तयार करण्यात आले होते. या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ऑडिओ, व्हिडिओ आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास टाकण्यात येत होता. त्याशिवाय, विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. ज्या मुलांनी या ऑनलाइन परीक्षांमध्ये सहभाग घेतला. त्यांचे गुण गुणपत्रिकेमध्ये टाकले जाणार आहेत. या ऑनलाइन परीक्षांवर विद्यार्थ्यांची गुणपत्रिका काढण्यात येणार आहे. ज्या मुलांनी ऑनलाइन परीक्षा दिलेली नाही त्यांना वर्ग करण्यात येणार आहे.
महापालिका माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंडे म्हणाले, माध्यमिक शाळांचे १० तारखेला निकाल जाहीर केल्यानंतर त्याची माहिती पालकांना एसएमएस आणि व्हॉट्सअपद्वारे कळविण्यात येईल. निकालपत्राचे वाटप मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर सोशल डिस्टन्स ठेऊन केले जाईल. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने त्याच्या निकालाबाबत अद्याप शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.