- दोषींवर कारवाईची नागरिकांकडून मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे जाधववाडी येथील आद्या राधा – कृष्ण सोसायटीमधील एका वृद्ध महिलेचा जीव गेला. हेमलता निवृत्ती जंगले महिला सदस्या कोविडमधून बऱ्या होऊन हॉस्पिटलमधून घरी आल्या होत्या. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच ऑक्सिजन सुरू होता; परंतु दुपारी ३० ते ४५ मिनिटे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळेत ऑक्सिजन मशीन विद्युत पुरवठा नसल्याने बंद पडली.
ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर लगेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला गेला; पण नेहमीप्रमाणे त्यांचे ठरलेले उत्तर मिळाले वीज येईल लगेच. लाईट काही आली नाही, पण कुणाची तरी आई त्यांना कायमची सोडून गेली.
विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे एखाद्याचा जीव जाणे ही मोठी हृदयद्रावक घटना आहे. गेलेल्या जिवाबद्दल दोषी कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे, संबंधित प्रकाराबाबत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

















