- सत्ताधाऱ्यांसाठी शिक्षणावरील खर्चापेक्षा डस्टबिन खरेदी महत्वाची..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विद्यार्थ्यांच्या पादत्राणे, मोजे, पीटी शूज, दफ्तरे, पाट्या, वह्या खरेदी, वॉटर बॉटल, व्यवसाय, स्वाध्यायमालाची आठ कोटी ८४ लाखांची रक्कम डस्टबिनसाठी वळविली आहे.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या २७ लाखांवर आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे १०५० टनांहून अधिक ओला आणि सुका कचऱ्याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा दररोज मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. तर, औद्योगिक, व्यापारी मालमत्तांसह निवासी मालमत्तांची संख्या सुमारे सव्वापाच लाख आहे. निवासी घरांमधील कचरा ओला आणि सुका या पद्धतीने विलगीकरण करून गोळा करणे बंधनकारक आहे. डस्टबीन खरेदीसाठी शालेय साहित्याचा निधी वळविण्यात आला.
दफ्तरे व पाट्या खरेदीसाठी २ कोटी ४७ लाख तरतूद होती. त्यातील २ कोटी ४६ लाखांची घट केले. वह्या खरेदीसाठी असलेल्या २ कोटी २० लाख रुपये मूळ तरतुदीतून १ कोटी ४० लाख रुपयांची घट केली आहे. वॉटर बॉटलसाठीच्या २ कोटी तरतुदीतील १ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम घट केली आहे. व्यवसाय, स्वाध्यायमालासाठी असलेल्या १ कोटी ३२ लाख तरतुदीतून ६० लाखांची घट केली. असे एकूण विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यावरील पावणेनऊ कोटी रुपये डस्टबीनवर सत्ताधा-यांनी वळविले आहे.
पाच वर्षांपूर्वी ओला कचरा व सुका कचरा गोळा करण्यासाठी २९ कोटी रुपये खर्च करून डस्टबिन खरेदी केलेले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी देखील ओला-सुक्या कचऱ्यासह घरगुती घातक कच-यासाठी शहरातील प्रत्येक कुटुंबाला तीन डस्टबीन देण्याचे नियोजन केले होते. मात्र, विरोध आणि टीका झाल्याने हा विषय थांबवला होता. इतर कामांतील तरतूद वळविण्यात आली आहे.