न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसें.) :- महापालिकेच्या आखत्यारीत अनेक झोपडपट्ट्या व गोरगरीब समाज राहतो. या गरजू समाजासाठी ब्लॅंकेट व चादर या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. सध्या शहरामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे.
समाजातील वंचित व गोरगरीब घटकांसाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने तसेच स्थायी समितीने ब्लॅंकेट व चादर वाटपाच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे. तरी, अजूनही प्रशासनाकडून ब्लॅंकेट व चादरीचे वाटप झालेले नाही. याबाबत नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
मुंबई महापालिका अधिनियम ६६ प्रमाणे झोपडपट्टी भागातील गोरगरीब जनतेला सेवा-सुविधा पुरवणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. गोरगरीब जनतेला आपल्या महापालिकेतर्फे ब्लँकेट वाटप झाल्यास त्यांना अत्यंत उपयोगी व त्यांच्या कामी येईल. तरी लवकरात लवकर आयुक्तांनी यात लक्ष घालून, चादर वाटपाचे आयोजन करावे, असे नगरसेविका मिनल यादव यांनी निवेदनात नमूद केले आहे.










