न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसें.) :- अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केल्याने चिडलेल्या वडिलांनी दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना नवी सांगवी चौकीत सोमवारी (दि.२४) रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
साहेबगौडा वामदेव पाटील (वय – ४९, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे (वय ४८, रा. बॉडिगेट पोलीस वसाहत, औंध) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहेबगौडा पाटील यांचा सतरा वर्षीय मुलगा दुचाकीवरुन ट्रिपल सीट जात होता. दुचाकी भरधाव वेगात असल्याने अपघात झाला. यात तिघेही रस्त्यावर पडले. या अपघातात लहान मुलगा बालंबाल बचावला. घटनास्थळी जमलेल्या जमावाने दुचाकीवरील तीनही मुलांना चोप दिला. त्यातील एकाने पोलिसांना शंभर नंबरवर संपर्वâ केला.
पोलिसांनी ताडीने धाव घेत तिघांनाही नवी सांगवी पोलीस चौकीत आणले. मुले अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांच्या वडिलांना पोलिस चौकीत बोलाविले. साहेब गौडा पाटील हे पोलीस चौकीत आले. त्यांनी मुलाला किरकोळ जखम झाल्याचे पाहिले. पोलिसांनीच मुलाला मारहाण केल्याचा त्यांचा गैरसमज झाला. त्यांनी थेट पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू सुपे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक निकुंभ अधिक तपास करत आहेत.










