न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसें.) :- राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार १९ डिसेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने ८ एप्रिल २०१६ मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ जारी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा ६० रुपये शुल्क आकारणार आहे. तर, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा ९० ते १२० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास दंड केला जाणार आहे. कचरा जाळल्यास ५० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे.
शोरूम, गोदामे, उपहारगृह आणि हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा १२० रुपये, दुकानदारांकडून दरमहा ९० रुपये, हॉटेलसाठी दरमहा १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ५० खाठापेक्षा कमी क्षमता असलेल्या रुग्णालयासाठी दरमहा १२० रुपये आणि ५० हून अधिक खाठा असलेल्या रुग्णालयासाठी १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शैक्षणिक, धार्मिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय यांना दरमहा ९० रुपये, मंगल कार्यालयांना दरमहा ३०० रुपये आणि फेरीवाल्यांकडून १८० रुपये शुल्क दरमहा घेतले जाणार आहे.
ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास पहिल्यांदा ६० रुपये दंड आकारला जाणार आहे. दुसऱ्यावेळी चूक केल्यास १२० रुपये आणि तिसऱ्यांदा चूक केल्यास १८० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. त्यांनतर प्रत्येक चुकीसाठी १८० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.










