- मोशीतील घटना; लहान भाऊ फरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मे. २०२१) :- घरगुती वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी दोनच्या सुमारास बो-हाडेवस्ती, मोशी येथे घडली.
मनोज ज्ञानेश्वर बो-हाडे (२५, रा. बो-हाडेवाडी, मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा लहान भाऊ संशयित आरोपी अक्षय ज्ञानेश्वर बो-हाडे (वय २२) हा फरार झाला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनोज आणि संशयित आरोपी अक्षय हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मनोज याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. दरम्यान, या वादातून गुरुवारी आरोपी अक्षय याने मनोजचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. अक्षय फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पथके पाठवल्याचे गवारे यांनी सांगितले.