- एकावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मे. २०२१) :- गृहसंस्थेच्या आवारात मोटारकारमधून देशी – विदेशी मद्याची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी वाल्हेकरवाडी येथे कारवाई केली. आरोपीकडून ३० हजार १२० रुपयांचा मद्यसाठा, मोटरकार, रोख रक्कम असा सात लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
दादासाहेब भीमराव चोपडे (वय ४२, रा. अंबिका मटण शॉपमागे, बिजलीनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. रेणुका तुळसी सोसायटीच्या आवारात मोटरकारमध्ये मद्यसाठा ठेऊन विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.