- मंडळाचे दोन लाखांचे मंजूर अर्थसहाय्य अद्यापही कागदावरच – जयंत शिंदे…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- करोनाने मयत झालेल्या नोंदीत बांधकाम कामगाराच्या वारसांना दोन लाख रुपये आर्थिक मदत मिळणार. तसा ठराव महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची अमलबजावणी करण्यासाठी बांधकाम कामगार सेना आग्रही असून, करोनाने मृत झालेल्या बांधकाम कामगाराच्या वारसांना ही मदत तत्काळ देण्यासाठी मंडळाचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत होणाऱ्या बांधकामांवर आकारल्या जाणाऱ्या उपकरांमधून मंडळाकडे हजारो कोटींचा निधी पडून आहे. तर अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची ओरड आहे. सद्यःस्थितीत करोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशभरात दररोज हजारो करोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. तर, बांधकाम मजूरही करोनाच्या तावडीतून सुटू शकलेले नाहीत. अनेकांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
मंडळाच्या ठरावानुसार नोंदीत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाखांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, करोनाबाधित कामगाराचा मृत्यू झाल्यास, वारसाना आर्थिक मदतची तरतूद नाही. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याच्या कामगारांची मृत्यूसंख्या पाहता १३ जुलै २०२० रोजी पार पडलेल्या ५५ व्या संचालकांच्या बैठकीत करोनाने मयत झालेल्या नोंदीत कामगाराच्या वारसालादेखील दोन लाख रुपये आर्थिक मदत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील या ठरावाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप बांधकाम कामगार सेनेने केला आहे. या घटकाला दिलासा देण्यासाठी या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी थेट मंडळाच्या सचिव, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे, असे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी म्हटले आहे.