- पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व कोयते जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मे. २०२१) :- महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या; मात्र फरार असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत.
पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली. हैदर जावेद सय्यद (वय २८, रा. पिंपळे गुरव), दीपक भीमराव सगर (वय २१), प्रथमेश ऊर्फ सोन्या यशवंत सावंत (वय २०, दोन्ही रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हैदर हा त्याचे साथीदार आरोपी सगर व सावंत यांच्यासह पवनाघाट स्मशानभूमी, काळेवाडी येथे थांबले असून त्यांच्याकडे हत्यारे आहेत. तसेच पुन्हा भांडणे करण्याच्या तयारी आहेत, अशी माहिती पोलिसांना शुक्रवारी (दि.७) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन लोखंडी कोयते जप्त केले. त्यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना मंगळवारपर्यंत (दि.११) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपी हैदर सय्यद याच्याविरोधात वाकड व हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, तर निगडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.