- कोविड लसींचा पुरवठा वाढवा; अचूक नियोजन करा..
- माजी उपमहापौर शैलजाताई मोरेंचे आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मे. २०२१) :- १ मे पासुन वय वर्षे १८ ते ४४ वयोगटासाठी कोविड १९ लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे कोवीड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका यंत्रणा कर्तव्य बजावत आहे. मात्र, लसींचा अपुरा पुरवठा, ऑनलाईन नोंदणीत त्रुटी व लसीकरण केंद्रात व्यवस्थापनाच्या अयोग्य नियोजनामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश नागरिक कोविड १९ लसीकरणापासून वंचित राहत आहेत. याबाबत माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात १८ ते ४४ या वयोगटासाठी कोविड १९ लसीकरण होत आहे. सध्या शहरातील आठ लसीकरण केंद्रावर २०० लसी उपलब्ध होत आहेत. मात्र या अपुऱ्या लसीमुळे अनेक नागरिकांना दररोज केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्रावर २०० ऐवजी ५०० लसींची पूर्तता करण्यात यावी. जेणेकरुन वयोगटातील सर्वांना लस मिळेल. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. बहुतांश वेळा त्यांना ऑनलाईन Appointment मिळत नाही. त्यासाठी पालिकेने ऑनलाईन नोंदणी क्लिष्ट न करता सोपी करावी.
बहुतांश ठिकाणी नोंदणी केलेल्या व्यक्ती लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी उपस्थित राहत नाहीत. या अनुपस्थित व्यक्तींच्या लसी कोणालाही देता येत नाहीत. त्या तशाच शिल्लक राहतात. अशा वेळी त्या लसीचा वापर प्रतीक्षेत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीस देण्यात यावी. पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. वय वर्ष ४५ पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्ती यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी लसींची संख्या मर्यादित न ठेवता अनेक पटींनी वाढवावी. लसीसाठी त्या त्या प्रभागातील नागरिकांना प्राधान्यक्रम असावा, असे या निवेदनात शैलजाताई मोरे यांनी म्हटले आहे.


















