- पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पासाठी २१ हजार ९४३ नागरिक प्रक्रियेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेत पेठ क्रमांक १२ येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पासाठी अर्ज केलेल्या २१ हजार ९४३ नागरिकांची अंतिम यादी अखेर मंगळवारी (दि. ११) रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे अंतिम यादीला एकदाचा मुहूर्त सापडला.
प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक १२ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ४ हजार ८८३ घरे उभारण्यात येत आहेत. प्राधिकरणाने यापूर्वी सोडतीसाठी २८ एप्रिलला प्रारुप यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ४ एप्रिलला अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १९ हजार ३६ तर, अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांसाठी २ हजार १०७ नागरिकांनी केलेल्या अर्जाचा अंतिम यादीत समावेश करण्यात आलेला आहे. आरक्षणनिहाय ही यादी प्रसिद्ध केली आहे.
प्राधिकरणाच्या उप-मुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील म्हणाल्या, पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पासाठी अर्ज केलेल्या नागरिकांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांच्या आलेल्या हरकतींचे निराकरण करण्यात आले आहे. सोडतीची तारीख, वेळ व स्थळ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.