- सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव स्थायीसमोर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- हिंजवडी आयटी पार्कला लागून असलेल्या रावेत, वाकड, पुनावळे व ताथवडे गावात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. त्याचा विचार करून पुनावळे येथे अग्निशमन केंद्र बांधण्याचे नियोजन पिंपरी – चिंचवड महापालिकेने केले आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.
पालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये वाकड पुनावळे व ताथवडे गावांचा समावेश होते. हिंजवडी आयटी पार्क, चांगल्या सोयी – सुविधांमुळे या भागात नागरीकरण वाढले आहे. मोठ मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. या परिसरात आगीच्या घटना घडल्यास पिंपरी, निगडी, रहाटणी अग्निशमन केंद्रावरून अग्निशामक बंब पाठवावे लागतात. मात्र, येथील दाट लोकवस्तीचा भाग, वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुनावळे येथे अग्निशामक केंद्र बांधण्यात येणार आहे.
पुनावळे येथील ९८३.३० चौरस मीटर व ३०८ चौरस मीटर असे एकूण १ हजार २९१.३० चौरस मीटर जागेवर अग्निशामक केंद्र बांधण्यात येणार आहे. या कामासाठी अग्निशामक विभागाकडे २० कोटी रुपयांची तरतुद उपलब्ध आहे. या कामाचे आराखडे तयार करणे, त्यास बांधकाम परवानगी घेणे. अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याच्या कामांसाठी इनव्हायरो सेफ यांची सल्लागारपदी नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आहे.


















