न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २७ डिसें.) :- महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे हे भ्रष्टाचारी यंत्रणांना पाठीशी घालीत असून, या भ्रष्टाचारी यंत्रणांचे मूळ हे संजय ताकसांडे आहेत. ताकसांडे यांनी सूडबुद्धीने शिवसेना नियुक्त विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांचे ‘न्यू सिमरन इंटरप्रायझेस’ या फर्मचा परवाना रद्द केलेला आहे.
तो त्वरित सौंदणकर यांना परत करावा, अन्यथा महावितरणाच्या प्रशासनास काळे फासण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना दिला होता.
याची दखल घेत आज गुरुवार (दि. २७) रोजी महावितरणाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधिक्षक अभियंता राजेश पवार व प्रशासकीय अधिकारी यांनी उपोषनस्थळी संतोष सौंदणकर यांची भेट घेतली. यावेळी मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी आपल्या मागण्यांची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल व न्यू सिमरन इंटरप्रायझेस’ या फर्मचा परवाना परत करण्याचे आश्वासन सौंदणकर यांना दिले आहे. आश्वासनाची दखल घेत सौंदणकर यांनी उपोषण सोडले आहे.
महावितरणाने तात्काळ सौंदणकर यांना परवाना परत करावा व यामागे खरे सूत्रधार यांना उजेडात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा शिवसेना त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे युवराज दाखले यांनी महावितरण प्रशासनास दिला आहे.












