- मात्र, कोरोनाच्या चाचण्यांमध्ये घट..
- अपेक्षित परिणामासाठी चाचण्या वाढविण्याची गरज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या मागील दिवसांपासून कमी होत आहे. परंतु मागील काही दिवसांची आकडेवारी पाहिल्यास चाचण्या कमी झाल्याचे दिसून येते. शहरात एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठड्यापर्यंत रोज सरासरी दहा हजार चाचण्या होत होत्या. सद्यस्थितीत मागील आठवड्यापासून रोज सरासरी आठ हजार चाचण्या होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
शहरात १२ मे ला १०१८० चाचण्या झाल्या होत्या. त्यानंतर १३ मेला ८८७५ चाचण्या झाल्या. १४ मेला ८३६८ तर १५ मे ला ८०९३, १६ मे ला ७६३९ आणि १७ मे ला ६६०९ चाचण्या झाल्या. यावरून मागील पाच दिवसांपासून चाचण्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे आवश्यक आहे. चाचण्यावरून संसर्ग जास्त आहे की कमी आहे दिसून येते. तसेच कोणत्या भागात किती रुग्ण आहेत. हे चाचण्यांवरून लक्षात येते. मागील काही दिवसांपासून चाचण्या कमी झाल्यामुळे रुग्ण संख्या कमी दिसून येत आहे हे नाकारता येत नाही. सध्या शहर परिसरामध्ये कोरोना रुणांची संख्या कमी झाली आहे. कोरोनाच्या चाचण्याही कमी केल्या आहेत. त्यामुळे रुणसंख्या कमी झाली आहे, अशी शक्यता व्यक्त होत आहे.


















