- थेरगाव रूग्णालयही लवकर सुरू करण्याचे नियोजन..
- कोरोना बाधितांची सोय; पालिका आयुक्तांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड पालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात ‘ड्राय रन’ येत्या सोमवारी (दि. २४) घेण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोनाबाधित वयोवृद्ध, आजारी रूग्ण दाखल करून उपचार सुरू केले जाणार आहेत. तर, थेरगाव रूग्णालय त्यानंतर आठवड्याभरात सुरू करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर आकुर्डी व थेरगाव रूग्णालयाचे काम तत्काळ पूर्ण करून ते कार्यान्वित करावे, या मागणीने जोर धरला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने अंतिम टप्प्यात वेगात काम पूर्ण केले आहे. सर्व कामे पूर्ण करून रुग्णालय लवकर सुरू करण्याचे आदेश महापौर उषा ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी गेल्या आठवड्यात दिले. त्या संदर्भात विचारले असता आयुक्त बोलत होते.
आयुक्त पाटील म्हणाले की, आकुर्डी रूग्णालय आवारात ऑक्सिजन प्लॅन्टही तयार करण्यात आला आहे. तेथून रूग्णालयात ऑक्सिजनची पाइपची जोडणी देण्यात आली आहे. ड्राय रन घेऊन तो लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. आठवड्याभराने थेरगाव रुग्णालय सुरू केले जाईल.
दोन्ही रुग्णालय मिळून एकूण ५०० ऑक्सिजन बेडची क्षमता आहे. दोन्ही रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी असणार आहेत. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तेथे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


















