- लहान मुले व नवजात बालकांसाठी आयसीयुत १५ बेड राखीव…
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पालिका सज्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मे. २०२१) :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन महापालिकेच्या वायसीएम व जिजामाता रुग्णालयात प्रत्येकी १५० ऑक्सिजन बेड व आयसीयुच्या ३० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच, चिखली, घरकुलातील चार इमारतीत लहान मुले व त्यांच्या पालकांसाठी स्वतंत्रपणे कोविड केअर सेंटर तयार करण्यात येत आहे.
लहान मुलांसाठी आयसीयुतील १५ आणि नवजात बालकांसाठी आयसीयुतील १५ बेड राखीव ठेवण्यात येतील. शहरातील १५० बालरोग तज्ज्ञांची तसेच रुग्णालयांची गरज भासल्यास मदत घेणार आहे. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील, आदित्य बिर्ला या रुग्णालयात देखील लहान मुलांचा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे.
लहान मुलांच्या अनुषंगाने सर्व साहित्य, उपकरणे लहान मुलांसाठीचे व्हेंटीलेटर उपलब्ध करणे व त्यासाठी लागणारा मनुष्यबळ व आवश्यक तो औषधे साठा तयार करण्यासाठी सूचना संबंधितांना दिल्या आहेत, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


















