- चाईल्ड व सारथी हेल्पलाईन क्रमांक जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने Task force (कृती दल) गठीत करण्यात आलेल्या सदस्यांची बैठक गुरुवारी (दि. २०) रोजी प्रभारी अतिरीक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्य उपआयुक्त अजय चारठणकर व सहा.आयुक्त अण्णा बोदडे यांच्या उपस्थितीत झाली.
महापालिका क्षेत्रातील कोविड १९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तपशिलवार माहिती समन्वय अधिका-यांस उपलब्ध करून देण्यात यावी. कोविड १९ या आजाराकरीता रूग्णालयात दाखल होते वेळी या कालावधीमध्ये आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रूग्णालयाकडून भरून घेण्याबाबत महापालिका क्षेत्रातील सर्व रूग्णालयांना निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे चाईल्ड हेल्पलाईन १०९८ बाबतचे माहितीफलक महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व रूग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावेत. महापालिका क्षेत्रामध्ये कार्यरत असणा-या बालगृहे/निरीक्षणगृहातील बालकांकरीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकिय पथक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कोविड १९ मुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांची माहिती ज्यांना असेल त्यांनी सदरची माहिती मनपाच्या सारथी हेल्पलाईन नंबर ८८८८००६६६६ या क्रमांकावर व [email protected] या ईमेलवर कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


















